

छत्रपती संभाजीनगर : जाफरगेट जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या एका ३ वर्षीय चिमुकल्यास कुत्र्याने चावा घेतला. परंतु कुत्र्याने चिमुकल्यास नेमका कुठे चावा घेतला, हेच पालकांना कळाले नाही अन् जेव्हा हे कळाले तेव्हा चिमुकल्याला रेबीसची लागल झाल्याचे आढळले. त्यामुळे आठ दिवसांतच त्याचा घाटी मृत्यू झाला. महापालिकेच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतून होत आहे.
जाफरगेट येथील रहिवासी आमिर शेख यांचा तीन वर्षीय चिमुकला शेख अरमान हा आठवडाभरापूर्वी बाहेर खेळत होता. त्यावेळी अचानक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. परंतु यात त्याच्या शरीरावर कुठेही चावा घेतल्याचे त्याच्या पालकाला दिसले नाही. त्यामुळे त्यांनीही या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. परंतु चार ते पाच दिवसांनंतर आरमानला शरीरावर खाज येण्यास सुरुवात झाली. आमिर यांनी त्याला जवळच्या दावाखान्यात दाखविले.
परंतु त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांना चिमुकल्यात रेबीजचे लक्षण अढळून आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर मुलाला डोक्यात कुत्रा चावल्याने रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. केसामुळे मुलाच्या आई-वडिलांना ही जखम दिसली नाही.
दरम्यान, त्यानंतर चिमुकल्यावर उपचार सुरू केला, परंतु तो आठवडाभरातच मरण पावला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यास महापालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतून कुत्र्याने चावा घेतल्यामुळे घाटीत उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
कुटुंबीयांनाही दिले इंजेक्शन
चिकुकल्याला रेबीज झाल्याने त्याला घरातील जेवढ्या सदस्यांनी हात लावला. त्या सर्वांना घाटी रुग्णालयाने इंजेक्शन घेण्याची सूचना केली. त्यानुसार मंगळवारी (दि.७) या सर्वांनी इंजेक्शन घेतले.