

Stop the polluted water flowing into the Sukhna River
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुखना नदीमध्ये कंपन्यांसह ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी तातडीने बंद करा, असे आदेश शनिवारी (दि. ६) महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे आणि मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांना दिले. त्यासोबतच नदीकाठावर बसविण्यात येणाऱ्या दगडाच्या पिचिंगबाबतही त्यांनी काही सूचना केल्या.
महापालिकेने खामनदीनंतर आता सुखना नदीच्या पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे. यात नदी पात्रावर दगड बसवून अकर्षक लूक देण्यात येत आहे. रुंदीकरण आणि ब्लू, रेड लाईन निश्चित केली जात आहे. शहरातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यावर प्रशासक जी. श्रीकांत यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत खामनदीनंतर सुखना नदी पुनरुजीवन काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाची शनिवारी त्यांनी पाहणी केली. प्रशासकांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु, नदीपात्रात येणारे दुर्गंधीयुक्त घाण पाण्यावावत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नदीत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदी पुनरुज्जीवनाच्या मूळ उद्देशाला बाधा येत आहे, हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांना महत्त्वाचे निर्देश देत नदीतील येणारे दूषित पाणी तातडीने थांबविण्याचे सांगितले. यावेळी नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून झालेल्या कामासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तेव्हा प्रत्येकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी परिसरातील आत्माराम दहीहंडे पाटील, रेखाबाई जाधव, रामकुवर रवे, सुमनबाई घोडके हे नागरिक उपस्थित होते.
प्रशासकांनी केले श्रमदान
खामनदीप्रमाणचे सुखना नदीदेखील दुर्गंधीमुक्त करण्यावर प्रशासक श्री. श्रीकांत यांनी भर दिला आहे. शनिवारी त्यांनी या नदीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर नदीच्या काठावर दगड बसविण्याचे कामात हातभार लावून स्वतः श्रमदान केले. तसेच नागरिकांनाही श्रमदानाचे आवाहन केले.