

Four people brutally beat up a young man for drinking alcohol
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चार जणांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांड्याने डोक्यात वार केला, यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ डिसेंबर रोजी रात्री उशिरा एन-११ येथील भाजमंडई परिसरात घडली. रोहन झाला (रा. एन-१२, हडको), आकाश ठोंबरे (रा. मयुरपार्क), निखील वडगाळे आणि विक्की सूर्यवंशी (एन-११ हडको) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणित दिगंबर जोजारे (२६, रा. द्वारकानगर, एन-११) ४ डिसेंबर रोजी रात्री भाजीमंडई परिसरात फिरत असताना त्याच्याकडे रोहन झाला, आकाश ठोंबरे, निखील वडागळे आणि विक्की सूर्यवंशी असे चौघे जण आले. त्यांनी प्रणितकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने पैसे नसल्याचे सांगताच सर्वांनी शिवीगाळ केली. त्याने समजावण्याचा प्रयत्न केला असता चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रोहन झाला याने जवळच पेटलेल्या शेकोटीतील लाकडी दांडा उचलून प्रणितच्या डोक्यात, वार केला.
दरम्यान हा गोंधळ ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच मारहाण करणारे तरुण पळून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी प्रणितला जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणी दरम्यान त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचे त्याने तक्ररीत म्हटले आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार माळुकर हे तपास करीत आहेत.