

Stock of suspicious sweets worth ₹1.92 lakh seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐन गणेशोत्सवात गुजरातहून ट्रॅव्हल्सने शहरात आणलेला १,१२१ किलो मिठाईचा संशयास्पद साठा एफडीए पथकाने पकडला आहे. पदमपुरा येथील पंचवटी हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये उतरवून ठेवलेला हा माल तापमान नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करता वाहतूक केल्याचे आणि जमिनीवर अस्वच्छ स्थितीत साठविल्याचे आढळले. अन्न व औषध प्रशासनाने दोन कारवायांत १ लाख ९२ हजार ७१० रुपये किमतीचा साठा जप्त केला.
सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेत अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका ल. झाडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) एस. ए. केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुजरातहून प्रवासी ट्रॅव्हल्समधून आणलेल्या मिठाईची तपासणी केली असता वाहतुकीसाठी आवश्यक तापमानाची काळजी घेण्यात आली नसल्याचे तसेच साठवणुकीची स्थिती अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही विक्रेत्यांकडील साठा ताब्यात घेण्यात आला.
पहिल्या कारवाईत सेवा सिंग हरमोहनसिंग सबरवाल यांच्याकडील ७२० किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख २४ हजार ५४० रुपये आहे. यात गणेशा कंपनीचा प्रीमियम डेझर्ट १४८ किलो, कृष्णा कंपनीचा डिलिशिअस स्वीट ३५८ किलो आणि कृष्णा कंपनीचा हलवा २१४ किलो होता.
हा माल जालना आणि परभणी येथे पाठविण्यात येणार होता. दुसऱ्या कारवाईत सागर सोमेश लिंबोरे, मे. वरद ट्रेडिंग यांच्याकडील ४०१ किलो साठा जप्त करण्यात आला. ६८ हजार १७० रुपये किमतीच्या या मालात सिद्धेश्वरी कंपनीचा डिलिशिअस स्वीट २६८ किलो आणि श्री श्याम कंपनीचा स्वीट हलवा १३३ किलो होता. हा साठा छत्रपती संभाजीनगरात विक्रीसाठी आणण्यात आला होता.
अहवालानंतर होणार पुढील कारवाई
एफडीएने दोन्ही साठ्यांमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. नाशवंत साठा पुढील आदेशापर्यंत बिडकीन (ता. पैठण) येथील फियो कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.