

छत्रपती संभाजीनगर : एटीएममध्ये पैसे काढताना कार्ड अडकवून बसल्याने मागे उभ्या भामट्याने अगोदर पासवर्ड पाहून नंतर त्यांना वॉचमनला घेऊन या, तो मदत करेल, असे म्हणत भामट्याने परस्पर ४३ हजार रुपये काढून लंपास केले.
ही घटना सोमवारी (दि.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेडकर चौक, चिकलठाणा येथे घडली. फिर्यादी संजय भाऊसाहेब जाधव (४२, रा. गोलोकधाम सोसायटी, वरूड फाटा) यांच्या तक्रारीनुसार, ते चिकलठाणा येथे एसबीआयच्या एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्या मागे एक भामटा उभा होता. त्याने अगोदर जाधव पैसे काढताना त्यांचा पासवर्ड पाहून घेतला. जाधव यांचे कार्ड मशीनमध्ये अडकल्याने ते परेशान झाले. तेव्हा भामट्याने तुम्ही मुकुंदवाडी येथील वॉचमनला घेऊन या, तो तुम्हाला कार्ड काढून देईल, असे सांगितले. जाधव हे एटीएम सेंटरच्या बाहेर जाताच भामट्याने त्यांच्या परस्पर कार्ड लंपास केले. त्यानंतर खात्यातून ४३ हजार काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.