

Woman police officer beaten up at police station for delay in filing complaint
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
पोलीस ठाण्याची वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संगणक बंद पडले. त्यामुळे भांडणाची तक्रार घ्यायला उशीर झाला. उशीर कसा झाला म्हणून तक्रार नोंदविणाऱ्या महिला पोलीस अंमलदारास पोलीस ठाण्याच्या आवारातच बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना सिल्लोड मध्ये घडली.
या प्रकरणी तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिस्मिल्ला कुरेशी, नूरीनिसा कुरेशी, कलीम कुरेशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ममता मोरे असे जखमी महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, तिन्ही संशयित आरोपी जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये आले होते, तेव्हा पोलीस ठाण्याची लाईट गेली होती. त्यामुळे थोडं थांबा लाईट गेल्यावर अर्धवट तक्रार होते असे म्हणत महिला पोलीस ठाणे अंमलदारांनी त्यांना सांगितले, मात्र यावरून तिघांनी जोरात दंगा सुरू केला. या दरम्यान पोलीस निरीक्षक शेषराव उदार हे देखील त्यांना समजावण्यासाठी तेथे आले असता तिघांनी त्यांनाही अरेरावी केली.
दरम्यान समजावण्यासाठी महिला पोलीस ममता मोरे या समोर आल्या असता, संशयित आरोपी बिस्मिल्ला कुरेशीने एका हाताने त्यांचा गळा पकडला तर दुसऱ्या हाताने केस पकडून जमिनीवर आपटले, या मारहाणीत महिला पोलिसांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.