

ST bus rams into vehicles at Mukundwadi signal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवरील मुकुंदवाडी सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने साखळी अपघात घडला. ही घटना गुरुवारी (दि.१९) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. यात एका रिक्षासह दुचाकी आणि कारचे नुकसान झाले असून, एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध (एमएच १४ केकयू ४९६८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रिक्षाचालक नितीन साहेबराव शेजूळ (४६) हे प्रवासी घेऊन एपीआय कॉर्नरकडून जालना रोडने चिकलठाण्याच्या दिशेने जात होते. मुकुंदवाडी येथे सिग्नल लागल्याने रिक्षा (क्र. एमएच २० डीसी ३०८३) व थांबवली. याचवेळी त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागे आणखी एक रिक्षा (क्र. एमएच २० ईके ३७७३) आणि एक दुचाकी (क्र. एमएच २० एफएच ना ४२०७) उभी होती, तर पुढे एक कार (क्र. एमएच ०३ ईबी ८४९६) उभी होती.
दरम्यान, पाठीमागून भरधाव एसटी बस चालकाने सिग्नलवर उभ्या असलेल्या या वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे पाठीमागील दुचाकी आणि रिक्षा पुढे ढकलली गेली. या धडकेत नितीन शेजूळ यांची रिक्षा पुढे उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळली. दोन्ही बाजूंनी चेपल्यामुळे शेजूळ यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर मार लागला आहे. इतर वाहनांतील प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर नागरिकांनी मदत करत रिक्षा बाजूला लावली आणि पोलिस ठाण्यात नेले. अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करत आहेत.