

Investigation into the Rohit Pathare murder case in Vaijapur now handed over to the CID
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : शहराला हादरवून सोडणाऱ्या रोहित पठारे हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या संवेदनशील प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिली.
रोहित पठारे हत्याकांडानंतर राज्यभरातून या घटनेविषयी संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींच्या अटकेपासून तपासाच्या कार्यपद्धतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर आंदोलकांनी पोलिसांना धारेवर धरले होते. तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
सीआयडीकडे तपास गेल्यानंतर घटनाक्रमाची नव्याने पडताळणी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती तसेच प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका या सर्व बाबींचा सखोल तपास होऊ शकतो. यापूर्वीच्या तपासात काही महत्त्वाचे मुद्दे राहून गेले असतील तर त्यांचीही पडताळणी होण्याची शक्यता आहे. घटनेमागील नेमके कारण आणि गुन्ह्यातील प्रत्येक संबंधिताची भूमिका स्पष्ट होणे आता सीआयडीसमोर महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
दुसरीकडे, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर परस्परविरोधी दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांचाही तपास स्थानिक पोलिसांकडून विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. या पथकाच्या तपासाची जबाबदारी बीड जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित पठारे हत्याकांड आणि त्याच्याशी संबंधित पूर्वीच्या हाणामारीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून बाहेर गेला आहे.
महासंचालकांसमोर मांडला संपूर्ण घटनाक्रम
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भीम आर्मीचे प्रमुख तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक डॉ. सदानंद वसंत दाते यांची भेट घेतली होती. या भेटीत रोहित पठारे हत्याकांड प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलक अशोक कांबळे यांनी पोलिस महासंचालकांसमोर संपूर्ण घटनाक्रम आणि आपली बाजू मांडली होती.