

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर आगारातील एसटी बसची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, रविवारी अंबाजोगाई धारूर मार्गावर धावणाऱ्या एमएच-२० बीएल-२३०० क्रमांकाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसात अक्षरशः भिजत प्रवास करावा लागला. बसच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडत होते. या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत एसटी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसात बसच्या छतावरील अनेक ठिकाणांहून पाणी गळत असल्याने बसमधील आसने, प्रवाशांचे सामान आणि प्रवासी पूर्णपणे भिजले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला. गळतीपासून बचाव करण्यासाठी प्रवाशांनी जागा बदलण्याचा प्रयत्न केला; मात्र बसच्या अनेक भागांतून पाणी गळत असल्याने त्यांचाही उपयोग झाला नाही.
धारूर आगार हे जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत कायम आघाडीवर राहिले आहे. प्रवाशांकडून नियमित महसूल मिळत असतानाही बसच्या दुरुस्ती व देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बसच्या छताची, खिडक्यांची व इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात गळक्या बसच रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे.
एकीकडे इंधन दरवाढ, देखभाल खर्च आदी कारणांचा दाखला देत प्रवासी भाड्यात सातत्याने वाढ केली जाते; मात्र त्या तुलनेत सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन एमएच-२० बीएल-२३०० या बसची त्वरित दुरुस्ती करावी किंवा तिच्या ऐवजी सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच धारूर आगारातील सर्व बसची विशेष तपासणी करून पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.