

Spontaneous response to Congress candidate interview
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसकडून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या रविवारी (दि.९) शहागंज येथील गांधी भवनात मुलाखतींना प्रारंभ झाला. जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, पैठण, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि खुलताबाद येथील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून गांधी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांनी इच्छुकांना मार्गदर्शन करत जास्तीत जास्त नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आवाहान केले.
फुलंब्री नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी सुमारे ३० उमेदवार, सिल्लोड नगरपरिषदेसाठी २८ उमेदवार, पैठणसाठी ५९ उमेदवार, वैजापूरसाठी ४०, कन्नडसाठी ४५, गंगापूरसाठी ६० आणि खुलताबादसाठी ५० उमेदवार उपस्थित होते. सर्व मुलाखती शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या असून, कुठेही शक्तिप्रदर्शनाला परवानगी देण्यात आली नव्हती.
या बैठकीदरम्यान अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखत तत्त्वनिष्ठ आणि जनाधार असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या मुलाखतींमुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाची काँग्रेसने दमदार सुरुवात केल्याचे चित्र जिल्हाभर उमटले आहे.