

छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यात सोयाबीन बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन आयातीचा मोठा सौदा पूर्ण झाल्याची माहिती बाहेर येताच स्थानिक बाजारातील दर घसरण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर वाढवून देऊ, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर आयात सुरू राहिल्याने हमीभाव मिळण्याचे गणित कोसळू लागले आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीनचा आयात सौदा पूर्ण करण्यात आला आहे. हा माल लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार आहे. आयात सोयाबीनचा अंदाजे दर 4870 रुपये प्रति क्विंटल पडत असल्याने स्थानिक बाजारपेठेला थेट फटका बसणार आहे. सरकारकडून घोषित केलेला 5328 रुपये हमीभाव मिळणे आता अत्यंत कठीण झाल्याचे चित्र आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनात घट झाली. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये म्हणून आयात माल मागवण्यात आला. लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण करण्यात आल्याने आता इतर व्यापारीही आयातीकडे वळत आहेत.
सध्या आयात सोयाबीनचा जागतिक दर Rs 4650 प्रति टन आहे. बंदरात माल उतरवल्यानंतर साठवणूक शुल्क म्हणून प्रतिटन 220 रुपये अतिरिक्त खर्च येतो. त्यामुळे आयात मालाचा खर्च स्थानिक दरांपेक्षा कमी येत असल्याने व्यापारी आयातीतूनच माल पुरवण्याला प्राधान्य देत आहेत.
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, जालना अशा जिल्ह्यांत सोयाबीन प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. स्थानिक उत्पादन कमी असल्याने उद्योगांना आयात माल स्वस्त आणि उपलब्ध असल्याचा फायदा होतो. परंतु याचा थेट तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणुकीत आश्वासने देऊन दरवाढीचे वचन दिले, पण पिकाचे दर पाडणारे निर्णयच घेतले जात आहेत. आयात माल मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर हमीभावासमान दर मिळणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे.
आता पुढील काही आठवड्यांमध्ये आयात माल बाजारात मोठ्या प्रमाणात आल्यावर स्थानिक सोयाबीनचे दर अजून खाली येतील की स्थिर राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.