Shravan Mahina | श्रावण सोमवारी असा हा योगायोग: जवखेडा येथील बिलवेश्वर मंदिरात साक्षात नागराज अवतरले; भक्तांची दर्शनासाठी गर्दी
Jawkheda Bilveshwar Mahadev Temple
नाचनवेल: कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. येथील प्राचीन व जागृत बिलवेश्वर महादेव मंदिरात आज (दि.४ ) सकाळी एक अद्भुत आणि चमत्कारीक घटना घडली. पहाटेच्या पूजेदरम्यान महादेवाच्या पिंडीवर साक्षात नागनाथ वेटोळे घालून बसलेले पाहायला मिळाले. हे दृश्य पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले आणि क्षणातच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली.
"हर हर महादेव" आणि "बिलवेश्वर शिव भगवान की जय" च्या जयघोषात मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाहून निघाला. भाविकांनी महादेव व नागनाथांचे मनोभावे पूजन-अभिषेक करून दर्शन घेतले. नागनाथांचे हे दर्शन शिवशक्तीचा चमत्कार आणि शुभशकुन असल्याचे स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितले.
या अद्वितीय प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे अपार श्रद्धा आणि भक्तिभावाची लाट उसळली आहे. मंदिर परिसरात आज दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.

