

Situation in Marathwada is dire due to lack of rain
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठावाड्यात मान्सूनच्या तीन महिन्यांत मोठ्याप्रमाणात पावसाचे खंड पडले आहेत. निसर्गाच्या या बदलामुळे विभागात बिकट स्थिती उद्भवणार असल्याची वास्तविक माहिती विभागीय आयुक्त आणि मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी बुधवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आढावा घेण्यासाठी ते स्मार्ट सिटी कार्यालयात आले होते.
यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जालनाचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जालन्याचे पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर परभणी, नांदेड, लातूर धाराशीव जिल्ह्याचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. याबाबत माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले की, मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरणाबाबतच्या अडचणी अधिकाऱ्यांकडून ऐकून घेतल्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर चर्चा झाली.
मराठवाड्यात पावसाचे खंड मोठ्याप्रमाणात झाले आहे. ऑगस्टमध्ये तब्बल २६ दिवसांचा खंडकाळ आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांसह पिण्याच्या पाण्याची देखील बिकट स्थिती उद्भवणार आहे. सध्या विभागातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुमारे याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती मांडली.
ती मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. मराठवाड्याच्या स्थितीवर प्रत्येक जिल्हाधिकारी तालुका व गावनिहाय माहिती घेत आहेत. आठवडाभरापासून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व धरणातील जलसाठ्यांत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पिकाचे ३० टक्के नुकसान
मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये जेवढी पेरणी झाली आहे. त्यातील सुमारे १२ टक्के पिकाचे नुकसान होणार आहे. तर जालना आणि बीडमध्ये अनुक्रमे २९ ते ३२ टक्क्यांपर्यंत नुकसान होणार आहे. धाराशिव, लातूरमध्येही सुमारे २८ टक्क्यांपर्यंत नुकसानीचे संकेत आहे. केवळ नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्येच सध्या पिकांची स्थिती थोडी बरी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
कापूस, सोयाबीन, मका संकटात
मराठवाड्यात पावसाचा खंड वाढल्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पिकांची स्थिती आता चिंताजनक आहे. दोन दिवसांपूर्वीच सचिवांनी देखील पीकस्थितीचा आढावा घेतला. त्यात विभागातील सर्वच जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे पीक धोक्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आात कापूसही अडचणीत आहे. कीड लागत असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.