

Sillod taluka faces water shortage, water reservoirs dry even after half of the monsoon season is over
मन्सूर कादरी
सिल्लोड तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने सिल्लोड तालुक्यातील मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्पांसह अनेक साठवण तलाव व पाझर तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. विहिरींनी तळ गाठलेला असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्याआधी बेमोसमी अवकाळीने मे महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात धो-धो कोसळून बऱ्याच प्रमाणात कहर केला होता. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असून, तालुक्यात जेमतेम ३३० मिमी पाऊस झालेला आहे. तालुक्यात पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे ७० टक्केही पाऊस झालेला नसून, जवळपास ३० टक्के पावसाची तूट आहे.
तालुक्यातील मध्यम, लघु धरणांचे सर्वच जलसाठे कोरडेठाक पडलेले असल्याने जलसाठ्यांची व जमिनीची तहान अद्याप भागलेली नाही. खरीप हंगाम तर कसाबसा निघून जाईल, परंतु सध्याचा पाऊस व जलसाठ्यांची परिस्थिती पाहता रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळेल का, अशी सामान्यांच्या मनात मोठी शंका आहे. रब्बी हंगामात सिंचनासाठी समोर स्पष्टपणे अडचण दिसत असताना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय कशी व कोठून होईल, हाही मोठा प्रश्न आहे. पावसाने मारलेली दडी पाहता दुष्काळ व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट घोंघावत असून, आतापासून या संकटाची धाकधूक वाढली आहे.
सिल्लोड तालुक्यात सध्याला जरी टँकरची गरज भासत नसली तरीही तालुक्यातील जलस्रोत आटत असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट समोर दिसत आहे. पावसाने तब्बल तीन आठवड्यांचा खंड दिला असून, अजून पावसाने पंधरा दिवसांची दांडी मारल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली.
जलसाठ्यात अत्यल्प पाणी सिल्लोड तालुक्यातील खेळणा, चारनेर पेंडगाव, अजिंठा-अंधारी, निल्लोड आदी मध्यम प्रकल्प व केळगाव, उंडणगाव, रहिमाबाद, हळद डकला लघु प्रकल्प मृत साठ्याच्या खाली गे-लेले आहे. कासोद धामणी व घाटनांद्रा आदी मोठे जल साठवण तलावांशिवाय तालुक्यातील इतर लहान लहान मोठे जलसाठे कोरडेठाक पडले आहेत.
खरीप हंगामावर अवलंबून
सिल्लोड तालुक्यात फार मोठे काही बागायती क्षेत्र नाही. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामाच्या पिकावर अवलंबून आहेत. तालुक्यातील मध्यम लघु प्रकल्पांसह साठवण तलाव पाझर तलाव, अशी सर्वच जलसाठे कोरडीठाक पडली असल्याने या भागातील शेकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिलेले आहे.