

सिल्लोड ः मागील तीन दशकांपासून आरोग्यसेवा उभारणीची नवी परंपरा निर्माण करणाऱ्या सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाने यावर्षी पुन्हा एकदा राज्यभरात आपला दबदबा सिद्ध करत डायलिसिस सेवा आणि प्रसूती (मातृत्व) सेवा या दोन्ही विभागांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला आहे.
आरोग्य मुख्य सचिव, उपसचिव, आरोग्य संचालक यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत अधीक्षक डॉ.महेश विसपुते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ओपीडी, शस्त्रक्रियांची विक्रमी कामगिरी
सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर, नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया, लेसर तंत्रज्ञान, रक्तपेढी आणि पुरेशा ऑक्सिजन सुविधांसह आधुनिक यंत्रसामग््राी उपलब्ध आहे. यावर्षीच 1 लाख 67 हजार 198 रुग्णांवर तपासणी व उपचार तर 2 हजार 299 नॉर्मल प्रसूती, 51 सिझेरियन, तसेच 620 नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या. कॅज्युअल्टी व ट्रॉमा विभागातून रेफर केलेल्या सर्वच रुग्णांना पुढील उपचार वेळेत मिळाल्याची माहिती अधीक्षकांनी दिली.
डायलिसिस विभागाची उल्लेखनीय कामगिरी
डायलिसिस तज्ञ डॉ.भालचंद्र बडे व डॉ.भाग्यश्री अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या डायलिसिस मशीनद्वारे रुग्णांना सुरक्षित, स्वच्छ व किफायतशीर उपचार उपलब्ध करून दिले. वेळेवर होणाऱ्या उपचारांमुळे मूत्रपिंड विकारग््रास्त रुग्णांना दिलासा मिळतो.
ट्रॉमा केअर : अपघातग्रस्तांना नवजीवन
अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील तज्ज्ञ डॉक्टरांची ट्रॉमा टीम हेड इन्जुरी, फॅक्चर व इतर गंभीर अपघाती घटनांमध्ये तातडीची आणि अचूक सेवा देत आहे. मागील वर्षी कॅज्युअल्टीत 340, तर ट्रॉमा युनिटमध्ये 126 याप्रमाणे 466 रुग्णांवर उपचार करण्यात आले.
व्हेंटिलेटर सुविधेला तज्ञ डॉक्टरांची गरज
रुग्णालयात 5 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत; मात्र गंभीर हार्ट अटॅक व इतर क्रिटिकल केसमध्ये एमडी मेडिसीन तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना रेफर करावे लागते. व्हेंटिलेटरच्या पूर्ण क्षमतेने उपयोगासाठी एमडी मेडिसीन तज्ञ डॉक्टर नेमणुकीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे अधीक्षक डॉ.महेश विसपुते यांनी स्पष्ट केले.
हेल्थ हब म्हणून उदय
सिल्लोड तालुक्याला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यासह खानदेशमधील जामनेर, जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद, तसेच सोयगाव, फुलंबी, खुलताबाद, कन्नड या तालुक्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवेसाठी सिल्लोडमध्ये येतात. आधुनिक सुविधा, प्रशिक्षित स्टाफ आणि अतिदक्षता सेवांमुळे रुग्णालयावर जनतेचा विश्वास सातत्याने वाढत आहे.