

A person selling nylon kite manja has been arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकाला वेदांत नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (दि.१) पद्मपुरा परिसरात करण्यात आली असून मांजाचे १९ गट्टू जप्त करण्यात आले. आदित्य साईचंद बासनीवाल (२२, रा. पद्मपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
पद्मपुरा भागात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती उपनिरीक्षक वैभव मोरे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आदित्य वासनीवाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण १९ मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, हा माल विक्रीसाठीच आणल्याची कबुली त्याने दिली. न्यायालयाने आरोपी आदित्य बासनीवाल याला ५ जानेव-ारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस आता या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.
जेलमधील ऋतिक लोधेकडून घेतला माल
आदित्यने हा माल ऋतिक लोधे याच्याकडून घेतल्याचे समोर आले आहे. ऋतिक लोधे हा सध्या नायलॉन मांजाच्या गुन्ह्यात हर्मूल कारागृहात आहे. त्याला गेल्या महिन्यात अटक केली होती. मुख्य आरोपी तुरुंगात असूनही त्याचे विक्रीचे नेटवर्क शहरात अजूनही कार्यरत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी ऋतिकला पुन्हा सहआरोपी करण्यात आले आहे.
थेट १ हजार रुपयांपर्यंत एक गट्टू
आरोपी आदित्यने हा माल नोव्हेंबर महिन्यात साधारण ३०० ते ३५० रुपये दराने खरेदी केला होता. मात्र आता मकर संक्रांत जवळ आल्याने आणि पोलिसांच्या कडक कारवाईमुळे बाजारात मालाची टंचाई निर्माण झाली आहे. याच संधीचा फायदा घेत ३५० रुपयांचा हा माल आता थेट १ हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची खात्रीशिर माहिती समोर आली आहे.