

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यात शुक्रवार, शनिवार असे सलग दोन दिवस मृग नक्षत्र बरसल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री व शनिवारी दुपारी मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने पेरणीला वेग आला आहे.
शुक्रवारी रात्री अंभई, गोळेगाव, आमठाणा, अजिंठा, निल्ल-ोड, बोरगाव बाजार या मंडळात पाऊस झाला. तर शनिवारी दुपारी अंभई, गोळेगाव, आमठाणा, भराडी, बोरगाव बाजार या मंडळात पाऊस झाला. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने अजिंठा, शिवणा, गोळेगाव, अंभई, आमठाणा, बोरगाव बाजार, भराडी, घाटनांद्रा, पळशी, अंधारी, रहिमाबाद, पालोद, निल्लोड परिसरात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. राज्यात मकाचा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे.
तालुक्यात मका, कापूस ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जात होती. मात्र मकाचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने गेल्या तीन चार वर्षांपासून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला होता. यामुळे मका, कापसाचे क्षेत्र घटले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळाला नाही. तर कापसाचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने यंदा शेतकरी पुन्हा मका पिकाकडे वळल्याचे चित्र तालुक्यात आहे. परिणामी कापूस, सोयाबीनचे क्षेत्र घटणार असून मकाचा पेरा वाढणार आहे.
दरम्यान तालुक्यात दोन सलग दिवस पावसाने हजेरी लावली. यात शुक्रवारी रात्री अजिंठा मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात ७० मिमी पाऊस झाला. तर शनिवारी दुपारी बोरगाव बाजार मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात ८४ मिमी तर भराडी मंडळात ६० मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसात तालुक्यात सरासरी ६० मिमी पाऊस झाला.