

सिल्लोड : तालुक्यात २४ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. यंदा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, सर्वाधिक ४० हजार ६३७ हेक्टर मका, १४ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर २३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे.
मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्यानंतर तालुक्यात पावसाचे आगमन झाले. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरीप पेरणीला उशीर झाला. मध्यम झालेल्या पावसावर कशीबशी पिके उभी राहिली होती. पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पेरणी नंतर हा पाऊस उपयुक्त ठरला. तालुक्यात एकसंघ सर्वदूर असा एकही पाऊस झालेला नसताना टप्प्या टप्प्यात पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी धाडस करून जवळपास ९४ टक्के पेरणी उरकली.
कृषी विभागाच्या महसूल अहवालानुसार, तालुक्यातील ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ९३ हजार ७९७हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने उगवलेली कोवळी पिके आता पाण्याअभावी करपू लागली आहेत.
तालुक्यात १० जुलैपासून पावसाने खंड दिलेला आहे. दोन- तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पेरणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी कोवळी पिके उन्हामुळे सुकू लागली आहे.
काही भागात विहिरी, बोअरवेलच्या पाण्याने पिके वाचवण्याची धडपड शेतकरी करीत आहे. तालुक्यातील धरणे, छोटे- मोठे जलसाठे कोरडेच असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
मंडळ निहाय झालेली पेरणी निल्लोड मंडळ १००. २७ टक्के, बोरगाव बाजार ९६. ९६, अंभई ९५. १५, भराडी ९५. ९५, आमठाणा ८५. ४, शिवना ८९. ३७, अजिंठा ८५. ४०, गोळेगाव ८९. १४ पालोद ९६. १५, सिल्लोड ९७. ३६, तरु उंडणगाव मंडळात ९६. ८१ टक्के पेरणी झाली आहे.
अल निनोचा प्रभाव, काही प्रमाणात आखातमधील युद्धाचा परिणाम असला तरी ५७५ मिलिमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे. यात काही ठिकाणी अतिवृष्टी होते. तर काही ठिकाणी खंड पडतो. उर्वरित काळात ३०० ते ४०० मिलिमीटर पाऊस ठराविक अंतराने पडला तर तो पुरेसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हवामान बदलाच्या या स्थितीला तोंड द्यावे. १३-०-४५ हे पोटॅशियम नायट्रेट अर्धा ते दीड टक्का द्रवणाची फवारणी करावी. पोटॅशियममुळे पिकाच्या पानांमधील 'स्टोमॅटा' (छिद्र) नियंत्रित राहतात. ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि पीक जास्त काळ टवटवीत राहते.
उदय देवळाणकर, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ