

नांदेड : जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा दडी मारल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. १५ जुलैअखेर मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी ६ लाख ५७ हजार ३२१ हेक्टरवर (८६.३१ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने या साडेसहा लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, उडीद, मुग तसेच तूर पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.
गतवर्षाच्या तुलनेत पेरणीत ८५ हजार हेक्टरची घट
यंदा १५ जुलैपर्यंत झालेली प्रत्यक्ष पेरणी ही मागील वर्षाच्या तुलनेत बरीच कमी आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ७ लाख ४३ हजार ०८५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा तब्बल ८५ हजार ७६४ हेक्टरने पेरणी घटली आहे. पाऊस लांबल्यामुळे आधीच उगवलेल्या पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून, अनेक भागात पाने पिवळी पडून पिके वाळू लागली आहेत. दुबार पेरणीची वेळही निघून गेल्याने आता शेतकऱ्यांमधील चिंता कमालीची वाढली आहे.
मुख्य पिकांची सद्यस्थिती आणि आकडेवारी
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून ती सरासरीच्या ९८.९९ टक्के म्हणजेच ४ लाख १३ हजार ८२४ हेक्टरवर झाली आहे. मात्र, पावसाअभावी सोयाबीनच्या रोपांची वाढ थांबली असून पाने पिवळी पडू लागली आहेत. कपाशीची पेरणी १ लाख ६४ हजार ६०७ हेक्टरवर (८१.७१ टक्के) झाली असून, पाण्याच्या कमतरतेमुळे कोवळ्या झाडांवर ताण वाढत आहे.
कृषी विभागाचा आंतरमशागतीचा सल्ला
पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावण्याबरोबरच उत्पादनातही लक्षणीय घट होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांमध्ये आंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या पिकांची पेरणी आकडेवारी
सोयाबीन : ४,१३,८२४ हेक्टर
कपाशी : १,६४,६०७ हेक्टर
तूर : ५३,२५२ हेक्टर
मूग : १०,६४३ हेक्टर
उडीद : ८,७१८ हेक्टर
तृणधान्य व तेलबिया पेरणीकडे दुर्लक्ष
कडधान्य पिकांमधील तूर, मूग आणि उडीद या तिन्ही पिकांना तातडीने पावसाची गरज असून, अन्यथा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, तृणधान्य पिकांची पेरणी केवळ ४ हजार ५६७ हेक्टरवर झाली असून ती सरासरीच्या फक्त १७.४५ टक्के आहे. यामध्ये भाताची ३५५ हेक्टर, ज्वारीची २ हजार ३७८ हेक्टर आणि मक्याची १ हजार ५३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया गटात तीळ २५६ हेक्टर, करडई १५७ हेक्टर, सूर्यफूल ७०२ हेक्टर, तर इतर गळीतधान्यांची २५५ हेक्टरवर पेरणी नोंदवली गेली आहे.