

Sillod Heavy rains lashed Saturday night
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सलग शुक्रवारी व शनिवारी (दि.१६) रात्री पाऊस झाला. शनिवारी रात्री तालुक्यातील चार मंडळांत अतिवृष्टी झाली, तर पूर्णा, अंजना, खेळणा नदीला पूर आला. दमदार पावसामुळे छोट्या मोठ्या जलसाठ्यांत पाण्याची आवक वाढली.
तालुक्यात पंधरा दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी रात्री पाऊस झाला. तर शनिवारी दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसात तालुक्यात सरासरी ७५ मि. मी. पावसाची नोंद झाली. तर शनिवारी रात्री पावसाने निम्मा तालुका झोडपून काढला. यात अजिंठा, अंभई, आमठाणा, गोळेगाव या चार मंडळात अतिवृष्टी झाली. तर शनिवारी पहाटेपर्यंत ५३ मि. मी. पाऊस झाला. मका, सोयाबीन पिके ऐन बहरात असताना पावसाने दडी मारली होती.
यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता. शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. तर शनिवारी रात्री जोरदार बँटिंग केली. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर्णा, अंजना, खेळणा नदीला पूर आला. तर केळगाव, अजिंठा अंधारी, खेळणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. केळगाव लघु प्रकल्प ६० टक्के भरला आहे.
तालुक्यात शनिवारी रात्री सरासरी ५३ मि. मी. पाऊस झाला. यात सिल्लोड मंडळात ३९ मि. मी. पाऊस झाला. भराडी ३३, अजिंठा ७३, अंभई ७८, गोळेगाव ७७, आमठाणा ६८, निल्लोड ४६, तर बोरगाव बाजार मंडळात १५ मि. मी. पाऊस झाला. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४१२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस असाच पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.