

Signs that the garbage collection company's operations will cease in just three months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुजरातस्थित खासगी कंपनीने कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच कामकाज थांबविण्याचे संकेत दिले आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मनुष्यबळ, वाढता आर्थिक भार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे सेवा सुरू ठेवणे कठीण झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
रेड्डी कंपनीचे कंत्राट संपल्यानंतर नव्या कंपनीने १,२०० कर्मचारी आणि बचतगटांतील ४२ कर्मचाऱ्यांचे समायोजन करून सुमारे ४५० नवीन कर्मचारी नियुक्त केले. मात्र, विविध शिफारशींमुळे आणखी ४०० हून अधिक कर्मचारी सेवेत घ्यावे लागल्याने आवश्यक १,७०० ऐवजी सध्या सुमारे २,१०० कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे किमान वेतन कायद्यानुसार दरमहा सुमारे दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने कचरा संकलनासाठी ५२५ नवीन वाहने उपलब्ध केली असून, त्यांचे कर्जहप्ते, इंधन व देखभाल खर्चामुळे आर्थिक ताण वाढल्याचेही सांगण्यात आले आहे.
'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर सेवा देण्याची तयारी असली, तरी सातत्याने तोटा सहन करणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाने महापौरांसमोर मांडल्याचे समजते. दरम्यान, आणखी सुमारे १०० जणांना, विशेषतः पर्यवेक्षक पदांवर, सामावून घेण्यासाठी राजकीय स्तरावरून दबाव वाढत असल्याचाही कंपनीचा दावा आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कामकाजातून माघार घ्यावी लागू शकते, असा इशाराही कंपनीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.