

'Siddharth Udyan' will be open for citizens from today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोम काढल्यानंतर तीन दिवसांत प्रवेश-द्वारावरील सिमेंटचे पिलर आणि बिम तोडण्यात आले असून, प्रवेशद्वाराचा रस्ता मोकळा करण्यात आला. यासह इतर कामांसाठी दीड महिन्यांपासून बंद असलेले उद्यान आज सोमवार (दि. २८) पासून सकाळीपासूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याचे मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त संजय चामले यांनी सांगितले.
महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानाच्या प्रवेशव्दाराचा काही भाग वादळीवाऱ्यामुळे ११ जून रोजी को सळला होता. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हे उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. उद्यानाच्या दर्शनीभागात उभारण्यात आलेल्या बीओटी प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.
दरम्यान बुधवारी (दि.२३) या उद्यानाच्या प्रवेशव्दारावरील सुमारे दोन टन वजनाचे डोम भल्यामोठ्या क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आले. त्यानंतर प्रवेशव्दाराच्या कमानीच्यावर ज्या भागात डोम उभारण्यात आला होता, तो भाग पाडण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले.
गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे पाडकामात व्यत्येय निर्माण होत होता. शुक्रवार, आणि शनिवार प्रवेशद्वाराचे पिलर आणि बिम तोडण्यात आले. या दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल ४७ दिवस उद्यान बंद असल्याने रविवारी स्वच्छता करण्यासाठी उद्यान खुले केले नाही. मात्र सोमवारपासून सिद्धार्थ उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याचे सहायक आयुक्त संजय चामले यांनी सांगितले.
सिद्धार्थ उद्यानाच्या दर्शनी भागात असलेल्या बीओटी प्रकल्पाच्या विकासकाने सुमारे २२ दुकानांच्या गाळ्यांची विक्री केली आहे. विकासकाने विकलेल्या गाळ्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यात आला. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्धाराचे डोम कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ११ जूनपासून बंद असलेले उद्यान तब्बल दीड महिन्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. मात्र जो पर्यंत संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार नाही, तोपर्यंत दर्शनी भागातील दुकाने बंद ठेवले जाणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त संजय चामले यांनी दिली आहे.