

First Monday of Shravan month: Twelfth Jyotirlinga Shri Ghrishneshwar Mahadev Temple
सुनील मरकड
खुलताबाद : आज श्रावण मासाचा पहिला सोमवार असल्याने हजारो भाविक श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतात. पवित्र श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यास मोठे धार्मिक महत्त्व असून, या महिन्यात सर्वच ज्योतिर्लिंगस्थानी भाविकांची दर्शनाकरिता गर्दी असते.
मंदिरात जाण्यासाठी आता नवीन मोठ्या दरवाजाचे काम करण्यात आले आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताना मध्ये मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी होणार आहे. मोबाइल, कॅमेरा, पिशव्या, पर्स मंदिराबाहेर ठेवाव्या लागणार आहेत. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी होणार असल्याने तसे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे चार वाजेपासूनच भाविकांच्या दर्शन रांगा लागलेल्या असतात यंदा देखील हीच स्थिती राहणार आहे. दर्शनाकरिता विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने भाविक पायी पालखी व दिंडीने येथे दाखल झाले आहेत.
संस्थान परिसरात पूजा साहित्य, प्रसादाची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. यावेळी येथे यात्रेचे स्वरूप येते. दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी वेगळा दरवाजा असल्याने गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
आजच्या आधुनिक जगात स्थापत्य कलाशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग मश्री घृष्णेश्वरफ आहे. वेरूळ येथे या ज्योतिर्लिंगाबरोबरच, लक्ष विनायक हे देवस्थान आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्व लाभलेले हे गाव नैसर्गिक वनराई, डोंगराच्या कुशीत वसले आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना निसर्गाचे आल्हाददायक रूप अनुभवावयास मिळते. वेरुळ येथील मश्री घृष्णेश्वरफहे बारावे ज्योतिर्लिंग असल्याने ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते.
श्री घृष्णेश्वर मंदिर लाल दगडात बांधलेले असून, आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे. सभामंडप २४ खांबांवर आधारलेला आहे. या मंदिराचे काम सन ७५० मध्ये राष्ट्रकुल घराण्यातील दंतीदुर्ग यांनी सुरू केले. वेरूळ येथे मंदिर विश्वस्त मंडळातर्फे धर्मशाळेचे काम सुरू आहे. वेरूळ येथे जगप्रसिध्द वेरूळ लेण्या आहेत. ऐतिहासिक स्मारक, शहाजीराजे भोसले यांची गढी आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच शिवालय तीर्थकुंडाचाही जीर्णोद्धार केला. तीर्थकुंड येथे शिलालेख आढळून येतो. मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे यांनी १५ व्या शतकात केला. या संबंधीचा शिलालेख मंदिरात आहे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिर सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून, चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून, मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.