

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या सिद्धार्थ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९) रात्री ९ वाजता मृत्यू झाला. याच प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या सिद्धार्थने आपले संपूर्ण आयुष्य याच ठिकाणी व्यतीत केले. गेल्या १७ वर्षांपासून पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या वाघाच्या मृत्यूने प्राणिसंग्रहालयातील एक महत्त्वाचे आकर्षण हरपले.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रहालयातील वाघांचे सरासरी आयुर्मान १६ ते १८ वर्षे असते. सिद्धार्थचे वय १७ वर्षे झाले होते. वाढत्या वयामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. तसेच त्याने अन्न घेण्याचे प्रमाणही कमी केले होते. मागील आठ दिवसांपासून त्याला मलविसर्जनास त्रास होत असल्याने पशुवैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, सिद्धार्थने अन्न घेणे पूर्णपणे बंद केल्यानंतर त्याला सलाईन, आवश्यक प्रतिजैविके आणि शक्तिवर्धक औषधांची इंजेक्शने देण्यात आली. पशुवैद्यकीय पथकाने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, वाढत्या वयामुळे उपचारांना त्याच्या शरीराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गुरुवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
मृत्यूनंतर खडकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयाचे सहायक आयुक्त डॉ. आर. डी. इंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबा जमाल, डॉ. तळेकर, डॉ. जे. एस. भगत आणि डॉ. गजानन चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण, वनपाल अविनाश राठोड आणि वनरक्षक डी. एस. पवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राणिसंग्रालयात आता चारच वाघ -सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालयात पिवळ्या रंगाचे चार वाघ असून, त्यात दोन नर आणि दोन मादी आहेत. याशिवाय पांढऱ्या रंगाचेही चार वाध असून, त्यात दोन नर आणि दोन मार्दीचा समावेश आहे. सिद्धार्थला यापूर्वीच स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवून उपचार सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला नाही.
अनंत जाधव, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी मनपा