

Shri Sant Eknath Maharaj Palkhi Welcome of Warkaris at Paranda
पैठण : चंद्रकांत अंबिलवादे
परंडा येथे श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे रविवारी (दि. २९) पायघड्या टाकून भव्य स्वागत करण्यात आले, नाथांच्या सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे आगमन झाल्याने भानुदास एकनाथच्या जयघोषात परांडानगरी दुमदुमली आहे.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी शनिवारी अनाळे येथील पंचक्रोशीत मुक्काम केला. रविवारी सकाळी कंडारी, पाचपिंपळे, पिंपरखेड मार्गे मार्गस्थ होऊन सायंकाळी पालखी सोहळा बाराव्या मुक्कामासाठी परंडा येथे दाखल झाला.
यावेळी पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून वारकऱ्यांचे पायगड्या टाकून जोरदार स्वागत करण्यात आले, परंडाचे तहसीलदार काकडे, नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ले, नगरसेवक वाजीद दखनी, जावेद पठाण, रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक पारेकर, महेंद्र देशमुख, इरफान शेख, मुसाभाई, संजय घाडगे, बच्चन गायकवाड, पापा शिंदे, मनोज कोळगे, गफार शेख, गोवर्धन शिंदे, सुभाष शिंदे यांनी नाथांच्या पादुकांचे, पालखी पूजन करून सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्यासह वारकऱ्यांचे स्वागत केले.
नाथाच्या पादुकांची परांडानगरीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्याचा विसावा देशमुख यांच्या वाड्यात करण्यात आला. यावेळी नाथांच्या पादुकांची समाज आरती करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव जिल्ह्यातून मार्गस्थ होऊन सोमवारी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. तेरावा मुक्काम बिटरगाव पंचक्रोशीत होणार आहे.