

A child marriage with a youth from Gujarat was prevented by the police
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुजरात येथील तरुणाशी अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह छावणी पोलिसांनी रोखला. हा प्रकार रविवारी (दि.२९) भावसिंगपुरा भागातील लालमाती येथे उघडकीस आला. मुलाकडील मंडळींनी मुलीच्या घरच्यांना पाच लाख रुपये देऊन विवाह करण्याचा घाट घातला होता, असे पोलिसांनी सांगितले.
भावसिंगपुरा भागातील लालमाती येथे १७ वर्षीय मुलीचा गुजरात येथील १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणाशी विवाह लावला जात असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जामदार जालिंदर माँटे, धर्मेंद्र राठोड, रवींद्र देशमुख आणि बाल कल्याण समितीचे अधिकारी रितेश धुर्वे यांच्यासह धाव घेतली.
एका गल्लीत मांडव टाकून सुमारे ५० वऱ्हाडी मंडळी दिसून आली. एकीकडे स्वयंपाक सुरू होता. खुर्चा टाकून जेवणाची तयारी केली जात होती. मांडवात लग्नात मुलीला देण्यासाठी संसारउपयोगी साहित्य ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यासह मुलीच्या पालकांना वयाचे पुरावे मागितले. त्यात ती १७ वर्षांची असल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्हीकडील पालकांना समज देऊन समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. बालविवाह कायद्यानुसार गुन्हा असून त्याबाबतचे दुष्परिणामांची माहितीही देण्यात आली.
मुलीचे वडील मजुरी काम करून कुटुंबाचा उदरर्निवाह करतात. गुजरात येथील व्यापारी कुटुंबातील मुलाचे स्थळ चालून आले. चांगल्या घरी मुलगी जात असल्याने आणि वरून पाच लाख रुपयेही देत असल्याने लग्नासाठी घाई केल्याचे पोलिसांना सांगितले.