

Shri Sant Eknath Maharaj Palkhi ceremony arrives in Solapur district with enthusiasm
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण, पुढारी वृत्तसेवा श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि. ३०) दुपारी परंडा (जि.धाराशिव) येथील पंचक्रोशीतून मोठ्या उत्साहात मार्गस्थ होऊन दुपारच्या विसावा भोजनासाठी सोलापूर जिल्ह्यात मुंगशी (ता. माढा) येथे प्रवेश केला आहे.
यावेळी नाथांचे पादुका पूजन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार विजय कवडे, सरपंच कमाल महाडीक, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, पोलिस पाटील निलम मोरे यांनी केले आहे.
मुंगशी परिसरातील भाविक भक्तांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या रथासह सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले व वारकऱ्यांची स्वागत जेसीबी मशीनद्वारे फुलांच्या वर्षांव करून करण्यात आले.
यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर पावली खेळून भानुदास एकनाथांचा जयघोष केला. नाथांच्या पालखी पादुकासाठी प्रथमच चांदीचा रथ तयार करण्यात आला आहे. या रथाची मिरवणूक गावातील नाथभक्तांनी वाजत गाजत काढली. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी मुंगशी येथील भाविकांचा निरोप घेऊन वारकरी पंढरीकडे मार्गस्थ झाले. तेरावा मुक्कामसाठी बिटरगाव (ता. माढा) या पंचक्रोशीत दाखल झाले. बिटरगाव पंचक्रोशीत भाविकांनी सोहळ्याचे जोरदार स्वागत करून महिला भाविकांनी पालखी मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या.
दरम्यान नाथाच्या पालखी सोहळ्याचे आतापर्यंत तीन रिंगण संपन्न झाले मंगळवारी दुपारी सोहळ्याचे चौथी रिंगण कव्हेदड येथे संपन्न होणार होणार असल्याने, गावातील भक्तांनी रिंगण सोहळ्याची जोरदार तयारी केली.
सोहळ्याचा चौदावा मुक्काम कुई पंचक्रोशीत होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांना या गावात पोहोचण्यासाठी महादेववाडी परिसरातील रेल्वे पटरीवरून मार्गस्थ व्हावे लागते. अशावेळी अपघात होण्याची भीती सतत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपाढी नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत या रेल्वे रुळावर पूल निर्माण करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या मार्गाची पाहणी करून रेल्वे प्रशासनाला अहवाल पाठविल्याचे माहिती दैनिक पुढारीशी बोलतानी दिली.