

Showers of rain breathe new life into Ellora
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : दमदार पावसाने वेरूळ परिसराला नवसंजीवनी मिळाली असून, ऐतिहासिक 'सीतेची न्हाणी' धबधबा खळखळून वाहू लागला आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले निसर्गप्रेमी आणि पर्यटक आता वेरूळ व म्हैसमाळकडे मोठ्या संख्येने वळू लागल्याने परिसरात पुन्हा एकदा पर्यटनाला चालना मिळाली आहे.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने वेरूळ परिसरातील डोंगररांगा, ओढे आणि धबधबे कोरडे पडले होते. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून, डोंगरकपाऱ्यांतून कोसळणाऱ्या 'सीतेची न्हाणी'च्या खळाळत्या प्रवाहाने पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांना भेट देणारे देश-विदेशातील पर्यटक आता सीतेची न्हाणी आणि निसर्गरम्य म्हैसमाळला आवर्जून भेट देत आहेत. धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईची चादर, थंडगार वारे आणि पावसाच्या रिमझिम सरी यामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. सोशल मीडियावरही या निसर्गरम्य दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे दिसून येत आहे.
म्हैसमाळ घाट परिसरातही पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, चहा, भजी, मक्याचे कणीस तसेच इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीला वेग आला आहे.
दरम्यान, पावसामुळे धबधब्याच्या परिसरातील दगड निसरडे झाले असून, पर्यटकांनी कोणताही धोका पत्करू नये, खोल पाण्यात उतरू नये तसेच सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाच्या आगमनाने वेरूळ आणि म्हैसमाळ परिसर पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास या भागातील निसर्गसौंदर्य आणखी खुलणार असल्याने पर्यटन हंगामाला चांगली सुरुवात झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.