Shortage of ₹500 Notes: Demand at the RBI stands at ₹100 crore, but only ₹30 crore is being received
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐन लग्नसराईच्या दिवसांत बँकांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा येत असल्याने असंख्य खातेदार, नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. चेस्ट बँकांकडून महिन्याला सरासरी १०० कोटींची मागणी केली जाते, मात्र, अवघे २५ ते ३० कोटींच्याच ५००च्या नोटा मिळत असल्याने अडचणी येत असल्याने वरिष्ठ बैंक अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यासह मराठवाड्यातील बँकांमधून खातेदारांना मागणीच्या तुलनेत ५०० च्या नोटा मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लग्नसराईचा धुमधडाका सुरू असल्याने कपडे, दागिने, फर्निचरसह विविध वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता असते. मात्र, खात्यात पैसे असूनही बँकाकडून पाचशेच्या नोटा नाहीत, डिजिटल व्यवहार करा असे सांगितले जात आहे.
त्यामुळे वधू-वर पक्षांची आर्थिक ओढाताण होत तर, असंख्य खातेदारही याच संकटामुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामे सुरू असल्याने बी-बियाणे आणि खते खरेदीसाठीही शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज पडते. मात्र, बँकांकडून ५००च्या मोजक्याच नोटा देण्याच्या अटीमुळे शेतकरीही हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, बँकांकडून ५०० रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने शेतकरी, नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ही गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी केली आहे.
शेतकरी, मेडिकल, लग्रसराईसाठी प्राधान्य
बँकांमध्ये ५०० च्या नोटांचा तीव्र तुटवडा असल्याने खातेदारांना मोजकीच रक्कम मिळत आहे. मात्र, लग्नसराई, मेडिकलसाठी तसेच शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या नोटा देताना प्राधान्य देत असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.