

Shiv Sena UBT Santosh Khendke Attack
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रभाग क्रमांक २२ मधील निवडणूक प्रचारादरम्यान गारखेडा परिसरात गोंधळ होऊन उमेदवाराच्या भावास मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सर्जेराव खेंडके पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. रात्री सुमारे १२.४० वाजता गजानननगर परिसरात प्रचारादरम्यान वाद निर्माण झाला.
गजानननगर येथील मुकुंद कुलकर्णी यांच्या घरासमोर त्यांचा भाचा वैजीनाथ लोखंडे प्रचारासाठी जागा पाहत असताना राजेंद्र जंजाळ व त्याच्या कार्यकर्त्यांनी पैशांचे वाटप केल्याचा आरोप करत शिवीगाळ व वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. त्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग वाहन उपस्थित असतानाही परिस्थिती चिघळली.
तक्रारदार संतोष खंडके पाटील घटनास्थळी पोहोचताच जमावातील दोन-तीन जणांनी त्यांच्यावर हाताबुक्यांनी मारहाण व धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तसेच त्यांचे भाऊ भास्कर सर्जेराव खेंडके व भाचा वैजिनाथ शिवाजी लोखंडे यांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजेंद्र जंजाळ व त्याच्यासोबत असलेल्या तीन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्रतिबंधक कारवाईसाठी प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.