

छत्रपती संभाजीनगर : शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मुख्य मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या १२ महिलांचे मंगळसूत्र, तर ३ तरुणाच्या सोनसाखळ्या असा तब्बल ८ तोळे २ ग्रॅम सोन्यावर डल्ला मारला. ही घटना गुरुवारी (दि.१९) रात्री ८:३० ते १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० ते १२ वाजेदरम्यान क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवजयंतीची मोठी गर्दी होती. फिर्यादी राजकुमार नारायण चौरे (२९, रा. पैठणगेट, मूळ बीड) हा मित्रासोबत मिरवणूक पाहण्यासाठी आला होता. गर्दीत त्याच्या गळ्यातील १३ ग्रॅमची सोन्याची चेन चोरीला गेली.
त्याचप्रमाणे संदेश जगताप (१३ ग्रॅम), प्रणव कदम (१३ ग्रॅम) तर पूजा बोबडे, सुवर्णा काळे, रोहिणी काकडे, सुनीता मुकदल, अस्मिता कदम, टिना वाघमारे, स्नेहल चव्हाण, कोमल काळे, स्वाती हिरकण, प्रतीक्षा अंधारे, कावेरी ठोंबरे आणि रिता जाधव या महिलांचे २ ते ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले.
अनेकांचे मोबाईल, पैसे गेले चोरीला
गर्दीत ८ तोळे २ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याशिवाय अनेक महिलांचे पैसे आणि मोबाईलही चोरीला गेले आहेत. क्रांती चौक पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. काही संशयितांना रात्रीच पकडून ठाण्यात आणले होते. यामध्ये एकही अल्पवयीनही होते. अधिक तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.