

Shiv-devotees launch a massive cleanliness drive at Bhangshimata Fort
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक गड-दुर्ग स्वच्छ व संवर्धित ठेवण्याच्या उद्देशाने श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि.१०) भांगशीमाता गडावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात ७० हून अधिक शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत गड परिसर स्वच्छ केला.
श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भांगशीमाता गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन व शिववंदनेने करण्यात आली. यावेळी गडांचे पावित्र्य जपण्याची शपथ स्वयंसेवकांनी घेतली.
त्यानंतर गड परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्स पाकिटे, प्रसादाच्या कॅरीबॅग, मावा-गुटखा पुड्या आदी कचरा गोळा करण्यात आला. तब्बल १६ मोठ्या डस्टबिन बॅग्स भरून कचरा संकलित करण्यात आला असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सातपुते यांच्यासह दत्तात्रय बोरुडे, शुभम चव्हाण, चेतन सोनावणे, प्रमोद पठाडे, उमेश वाघ, योगेश थोरे आदी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
तसेच प्रतिष्ठानच्यावतीने दरमहा एका गडावर स्वच्छता मोहीम राबवून गड-दुर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे काम केले जात आहे. संस्थेच्या विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती www. misanatan. com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.