

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन केंद्रात गरीब, गरजवंतांना १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३५९ शिवभोजन केंद्र असून या केंद्राला लाभ मोठ्याप्रमाणात नागरिक घेत आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून विभागातील आठही जिल्ह्यांतील केंद्रांचे १६ कोटी ९८ लाख ३४ हजार ४४० रुपयांची देयके थकली आहेत. त्यामुळे केंद्रचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक १०१ शिवभोजन केंद्रांची संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये ६२, बीडमध्ये ५८, लातूर ३५, जालना, परभणी प्रत्येकी ३३ आणि हिंगोली २२ व धाराशिव १५ असे ३५९ केंद्र सुरू आहेत.
या केंद्रांतून दररोज शासनाच्या अटीशर्तीनुसार गरजवंतांना शिवभोजन थाळी देण्यात येते. त्यासाठी केवळ १० रुपये शुल्क घेण्यात येते. तर शासनाकडून केंद्रचालकाला अनुदानापोटी उर्वरित फरकाचे ४० रुपये अदा केले जाते.
मागील सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरातील केंद्रांचे देयके अदा करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात १०१ केंद्रांचे ४ कोटी ७ लाख १४ हजार रुपयांची देयके थकली आहेत. शिवभोजन योजनेत गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, अनुदान वेळेत मिळत नसल्याने केंद्रचालकांवर आर्थिक ताण वाढत आहे. शासनाकडून प्रलंबित अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
मराठवाड्यातील सर्व ३५९ शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही बसविले आहेत.
सर्वाधिक प्रलंबित रक्कम छत्रपती संभाजीनगरची ४ कोटी ७ लाख १४ हजार रुपये आहे.
त्यापाठोपाठ परभणीची ३ कोटी ३० लाख ९० हजार ४४० रुपये देयके प्रलंबित आहेत.
एकूण प्रलंबित देयकांची रक्कम १६ कोटी ९८ लाख ३४ हजार ४४० रुपये आहे.