

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
तीन दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर होते. संभाजीनगरच्या वैजापूर व पैठणमध्ये त्यांच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वैजापूर येथील सभेमध्ये बोलताना ठाकरे यांनी वैजापूरचे शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. "स्वर्गीय वाणी साहेब असते, तर या गद्दारांना उलटा टांगले असते" तसेच या गद्दारांना पाडायला आज आपल्याकडे आलो आहे, असे देखील ते म्हणाले.
त्यावर बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर दिले आहे. ठाकरेंनी माझ्यावर ज्या पद्धतीची खालच्या पातळीची टीका केली. ते एका माजी मुख्यमंत्र्याला शोभते का? तसेच "जेव्हा तुम्ही काँग्रेस सोबत गेला" तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हालाच उलट टांगले असते, असे प्रत्युत्तर दिले. तसेच २०१९ च्या निवडणुकीत पैसे देऊन उमेदवारी दिली जाणार होती, असा गंभीर आरोप बोरनारे यांनी ठाकरेंवर केला आहे.