

Sanjay Shirsat on Sharad Pawar
छत्रपती संभाजीनगर : शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी देण्याचा निर्णय सहजा सहजी घेतलेला नाही. त्यांनी इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा निर्णयाने जातीवादाला खतपाणी मिळेल. त्यांना संभ्रम निर्माण करून दुसरचं सांगायचं असतं, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आज (दि. १०) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिरसाट यांनी शरद पवार यांच्या मूळ ओबीसी उमेदवारांनांच संधी देण्याच्या निर्णयावर टीका केली. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षाची असावी. ही त्यांच्या पक्षाची भूमिका असून त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे, असे शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांची तब्यत चांगली नाही. उपचार घ्यावे. आजार पणात मी शांत बसत नाही, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युती करताना कोणत्या जागा ठेवायच्या कोणत्या द्यायच्या अजून ठरलेले नाही. प्रत्येकाने आपापली ताकद आजमावली आहे. स्थानिक नेत्यांचे मत विचारात घेऊन ठरवणार असे भाजप म्हणाले. तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील. वड्डेटीवर, भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यांच तळ्यात मळ्यात चालू आहे. अनेक पक्षात असे प्रकार घडतील, असही शिरसाट यांनी सांगितलं.
मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, "एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना समिती ठरवत असते सुरक्षा वाढवायची की नाही. जाणीवपूर्क असे होत नाही. गुप्त माहितीच्या आधारावर होत असते."
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती किंवा आघाडी करायची नाही, अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्या आहेत. त्याचवेळी या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्यावी. जिथे मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ तिथेच कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्यावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. मागासवर्गीयांचे बोगस प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवण्यास अनेक उमेदवार इच्छूक असतात, अशा ठिकाणीही लक्ष देऊन मूळ मागासवर्गीयांनाच संधी देण्याबाबतही पवारांनी सांगितलं आहे.