Lok sabha Election 2024 Results : मराठवाड्यात भाजपला धक्का: दानवे, जानकर, चिखलीकर, शृंगारे यांचा पराभव

प्रतापराव पाटील, रावसाहेब दानवे, महादेव जानकर
प्रतापराव पाटील, रावसाहेब दानवे, महादेव जानकर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रासपचे महादेव जानकर, शिवसेना (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे, भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरे, नांदेडातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा विजय निश्‍चित आहे. बीड मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात 28 व्या फेरीअखेरपर्यंत अटीतटीची लढत होती.

मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ असून,सर्वच लढती चुरशीच्या ठरल्या. छत्रपती संभाजीनगरातून शिवसेनेचे (शिंदे गट) संदीपान भुमरे यांचा विजय निश्‍चित आहे. एकविसाव्या फेरीअखेर भुमरे यांचे मताधिक्य 1 लाख 15 हजार 525 एवढे होते. या मतदारसंघात एमआयएमचे नेते, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. सुरवातीच्या काही फेर्‍यांत खैरे हे पहिल्या क्रमांकावर होते. परंतु नंतर मात्र ते थेट तिसर्‍या क्रमांकाव पोहचले.

जालन्यात भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात थेट लढत झाली. बावीसाव्या फेरीअखेर काळे हे दानवे यांच्यापेक्षा 89 हजार मतांनी आघाडिीवर होते. काळे यांना 517339 तर दानवे यांना 436448 मते होती. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना 131812 एवढी लक्षणीय मते पडली.

बीडमध्य चुरस

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरस आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला होता. त्यामुळे बीडची लढत अटीतटीची ठरली. पहिल्या काही फेर्‍यां मध्ये आघाडीवर असणार्‍या सोनवणे यांना नंतर मुंडे यांनी रोखून ठेवले. परंतु 28 व्या फेरीनंतर सोनवणे हे पाच हजार मतांनी आघाडीवर होते. धाराशिव मतदारसंघात शिवसेना (उबाठा) चे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अर्चना पाटील यांना सव्वा तीन लाख मतांनी पराभूत केले. लातुरात भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी 63 हजार मतांनी पराभव केला. परभणीत शिवसेनेचे (उबाठा) बंडू जाधव यांनी हॅटट्रिक करीत रासपचे महादेव जानकर यांना पराभूत केले. हिंगोलीत उबाठाचे नागेश आष्टेकर यांनी शिवसेनेेचे बाबूराव कदम कोहाळीकर यांना धूळ चारली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे नांदेडच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष होते. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांचा पन्‍नास हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

तीन विद्यमान खासदार पराभूत

मराठवाड्यात विद्यमान खासदार इम्तियाज जलील, सुधाकर शृंगारे, रावसाहेब दानवे या तिघा जणांना पराभव पत्करावा लागला. तर बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर हे दोघे पुन्हा विजयी झाले. संदीपान भुमरे, डॉ. कल्याण काळे, नागेश पाटील आष्टीकर, वसंतराव चव्हाण, डॉ. शिवाजी काळगे हे प्रथमच लोकसभेवर निवडून गेले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news