

छत्रपती संभाजीनगर : शिव-सेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वादावर नुकताच पडदा टाकला. मात्र, आता पक्षात स्थानिक पातळीवर नाराजीनाट्धाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.
गुलमंडी प्रभागातून पक्षाचे लोकसभा प्रभारी किशनचंद तनवाणी आणि आमदार प्रदीप जैस्वाल या दोघांचीही मुले निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यावरून या दोघांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. परिणामी, तनवाणी हे उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रियेपासून दूर आहेत.
विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंच्या सेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेने किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तनवाणी यांनी हिंदूंच्या मतांमध्ये विभाजन नको म्हणत ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ते शिंदेंच्या सेनेत दाखल झाले. शिवसेनेत त्यांना पुढे लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु आता गुलमंडी प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवारीच्या मुद्यावरून तनवाणी विरुद्ध जैस्वाल असा छुपा संघर्ष सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मागीलवेळी तनवाणी यांचे भाऊ राजू तनवाणी हे गुलमंडी येथून नगरसेवक होते. तसेच त्यांचा मुलगा स्वीकृत नगरसेवक होता. आता गुलमंडी प्रभागातील एक जागा खुल्या प्रभागासाठी आहे. तेथून तनवाणी यांचे चिरंजीव चंदू तनवाणी हे इच्छुक आहेत. तर दुसरीकडे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव वीकेश जैस्वाल हे देखील येथूनच निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून शिवसेनेचे उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाले. परंतु
66 उमेदवारी वाटपाच्या कार्यक्रमाचा मला निरोपच नव्हता. वर्तमानपत्रातूनच कळले. शिंदे साहेबांनी मला लोकसभा प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु काही जणांना माझी अडचण होत असेल तर त्यांनी शिंदे साहेबांना सांगून माझे पद काढून घ्यावे. जिल्हाप्रमुख सांगतो, त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आले नसतील. पण माझी तब्येत चांगली आहे. मी माझ्या कार्यालयात नेहमीच बसलेलो असतो.
किशनचंद तनवाणी,लोकसभा प्रभारी, शिवसेना
माझा मुलगा गुलमंडीमधून लढणार हे आधीच ठरलेले आहे. तो स्वतः तनवाणीसाहेबांकडेही गेला होता. त्याने तसे आधीच त्यांना सांगितलेले आहे. आम्ही दोघे मित्र आहोत. पण त्यांचा मला त्याबाबत काही फोन आला नाही. ते परदेशात गेल्याचे मला समजले होते. मीही हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात होतो. आजच आलो. आमचे जुने संबंध आहेत. नाराजीचा प्रश्नच येत नाही.
प्रदीप जैस्वाल, आमदार, शिवसेना
तनवाणी साहेब हे माझे वरिष्ठ आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बैठकीला ते हजर होते. परंतु काही दिवसांपूर्वी ते परदेशात गेल्याची माहिती मिळाली होती. म्हणून त्यांना कालच्या कार्यक्रमाचा निरोप दिला गेला नाही, परंतु यानंतरच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिले जातील.
राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना