

Seals on properties will not be removed until taxes are paid.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: थकीत मालमत्ता करापोटी महापालिकेने शहरातील ७९ व्यावसायिक मालमत्तांना सील ठोकले आहे. यावर जोपर्यंत कर भरणार नाही, तोपर्यंत सील काढले जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला असून, प्रशासनाने यातून कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवल्याने मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाली आहे.
महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात कर वसुलीला गती देत थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व दहा झोन कार्यालयांच्या माध्यमातून एकाचवेळी कारवाई करण्यात आल्याने मोहिमेला वेग आला मनपाचे तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत आणि अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक विकास नवाळे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. मनपाने ४ मार्चपासून सुरू केलेल्या या धडक मोहिमेत २७ मार्चपर्यंत ७९ मालमत्तांना सील करण्यात आल्या.
त्यामुळे जप्ती टाळण्यासाठी अनेक थकबाकीदारांनी तातडीने कर भरण्यास सुरुवात केली. दरम्यान, या ७९ मालमत्तांवर ८ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले असून, कर न भरल्यामुळे आयुक्तांच्या आदे-शानुसार थेट सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
तर कायदेशीर कारवाई
महापालिकेने थकीत कराचा भरणा न केलेल्या ७९ व्यावसायिक मालमत्ता सील केल्या आहेत. त्यापैकी काही मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली. त्यानंतर त्यांचे सील काढण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. विकास नवाळे, मनपा .
सील काढल्या प्रकरणी गुन्हा
महापालिकेने जप्त केलेल्या एका मालमत्तेचे सील विनापरवानगी काढल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी संबंधित मालमत्ताघ-ारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.