

Scorching heat amidst cloudy skies; mercury hovering near the 40-degree mark
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याला सुरुवात होऊन आठवडा उलटला असला तरी शहर व परिसराला अद्यापही मे महिन्यातील उन्हाच्या झळाच सहन कराव्या लागत आहेत. पावसाने ओढ दिल्याने शहरात उष्णतेचा कहर कायम असून पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत असतानाही उकाड्यात कोणतीही घट झालेली नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
जून महिना म्हणजे पावसाचे आगमन आणि उष्णतेपासून दिलासा मिळण्याचा काळ मानला जातो. मात्र यंदा जूनचा पहिला पंधरवडा संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आकाशात दिवसभर ढगांची वर्दळ दिसून येते. मात्र पावसाचे चिन्ह नसल्याने उष्णतेची तीव्रता कायम असून शहरात अजूनही मे महिन्याप्रमाणेच उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे.
दरम्यान ५ जून रोजी अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची आशा निर्माण झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी उन्हाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. शहरात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत असतानाही उष्णतेचा प्रभाव कमी झालेला नाही.
तसेच दुपारच्यावेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये नेहमीपेक्षा वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासीयांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत शहरवासीय
मे महिन्याच्या अखेरीपासूनच पावसाची चाहूल लागली असली तरी अद्यापपर्यंत पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग वाढत असल्याने लवकरच पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वातावरणात वाढला दमटपणा
वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाली. मात्र हवेत ओलावा वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागला.