

School boy crushed by truck near Mukteshwar Mill
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय मुलास चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २८) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास इसारवाडी फाटा ते शेंदूरवादा बिडकीन महामार्गावर मुक्तेश्वर शुगर मिलजवळ घडली.
कृष्णा दत्तात्रय म्हस्के (१५ रा. भगतवाडी मुर्शिदाबाद) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. या विषयी पोलिसांनी सांगितले की, कृष्णा हा शेंदूरवादा येथील शाळेत शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी दुचाकी घेऊन तो शाळेकडे निघाला होता.
सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास मुक्तेश्वर शुगर मिलजवळ इसारवाडी फाट्याकडून बिडकीनकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक (आरजे १९, जीके-३५८५) ने कृष्णा चालवत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात कृष्णा हा ट्रकच्या चाकाखाली सापडून चिरडला गेला. दम्यान अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कृष्णाला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
सायंकाळी भगतवाडी येथील स्मशानभूमीत कृष्णा याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.