

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीत आता नव्या ट्विस्ट आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवलेले आ. संजना जाधव आणि आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांचे अर्ज विभागीय सहनिबंधकांनी वैध ठरवले आहे. इतरही सात जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले असून, इंदुमती पाटील यांचे अपील मात्र, फेटाळण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधकांनी अपीलांवरील सुनावणीचा निकाल शुक्रवारी (दि.१९) जाहीर केला.
येथील जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, नवीन २१ संचालक मंडळासाठी जिल्ह्यातील १५८ उमेदवारांनी विविध मतदार संघातून २१४ अर्ज दाखल केले होते. ९ जून रोजी छाननी आणि आक्षेपांवरील सुनावणीनंतर तब्बल ४५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. यात कन्नडच्या आ. संजना जाधव, सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांचेही अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्यामुळे या दोघांसह एकूण ९ जणांनी या निर्णयाला आव्हान देत विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते.
या सर्व अपीलांवर १७ जून रोजी सुनावणी पार पडली. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात आ. संजना जाधव, आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांच्यासह प्रणिकेत पाटील, सुवर्णा जाधव, मनोज राठोड, रितेश मुनोत, मनोज देशमुख आणि प्रदीप शिंदे या आठ जणांचे अपील मंजूर करण्यात आले. त्यामुळे हे सर्व जण आता निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहे. तर इंदुमती साहेबराव पाटील यांचे अपील फेटाळण्यात आल्याची माहिती विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.
२३ जूनपर्यंत माघारीची मुदत
जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खा. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, विलास भुमरे, रमेश बोरणारे, अनुराधा चव्हाण, रंजना जाधव, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्यासह अनेक दिग्गज मिळून एकूण १२० उमेदवार आहेत. एका उमेदवाराने माघार घेतली आहे. २३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ४ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.