

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे. सोमवार, दि. 1 जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असून भाजप आणि महाविकास आघाडीकडून कोणाचे अर्ज दाखल होणार, याची कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस राहिले आहेत. निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. भाजपकडून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या अधिक असली, तरी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.
महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आली असून, त्यांच्याकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, भाजपची भूमिका जाहीर होण्याआधीच बंडखोरीचा पवित्रा घेत शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार देणार की सेनेला साथ देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे तानाजी पाटील (रा. क्रांतिसिंहनगर, पुजारवाडी, आटपाडी, ता. आटपाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार, 1 जून असून, अर्जांची छाननी मंगळवार, दि. 2 जून रोजी होणार आहे.