

Sand smuggling poses a major threat to the bridge and dam
पैठण, पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या आपेगाव, कुराणपिंपरी परिसरातील वाळू तस्करांनी धुमाकूळ घालून गोदावरी नदीतून वाळूची तस्करी सुरू केली आहे. यामुळे परिसरातील पुलासह बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तहसील विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील नागरिकांसह पोलिस पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
गाव पातळीवर अवैधरीत्या वाळू वाहतूक उत्खनन होत असल्यास या प्रकाराचा अहवाल तत्काळ संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्याची आदेश गावाचे पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे आपेगाव, कुराणपिंपरी गावाच्या परिसरातील गोदावरी नदीतील पूल व बंधाऱ्याच्या परिसरातून वाळू तस्करांनी धुमाकूळ घालून अवैधरीत्या वाळू बैलगाडीच्या सहाय्याने तस्करी सुरू केल्यामुळे या परिसरातील पुलांसह बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला असून. महसूल विभागाचे कर्मचारी आर्थिक हितसंबंधातून या अवैधरीत्या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरातील नागरिकांनी व पोलिस पाटील यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान आपेगाव, कुराणपिंपरी परिसरातील गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यामुळे तत्काळ या ठिकाणी महसूल पथकाकडून कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिले आहे.
दरम्यान पैठण महसूल विभागांतर्गत गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांची मर्जी राखून काही तलाठी या परिसरातील अवैधरीत्या वाळू तस्करांच्या अर्थपूर्ण मदतीने ठाण मांडून असल्यामुळे वाळू तस्करी थांबवण्यास पुढे येत नसल्यामुळे. कारवाई करायची तरी कोणी असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला असून आपेगाव परिसरातील तलाठी सुधाकर निकम यांनी मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष करून रात्री होत असलेली वाळू तस्करी आम्ही थांबू शकत नाही, असे म्हणून आपले हात वर केले आहे.