

Sand mafia's tyranny, attack on revenue team
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील बाजार तळ परिसरात अवैध वाळू उत्खननाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर काही जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तलाठी कडूबा रामभाऊ तुपे (५७) यांच्यावर चाकूचा वार करण्यात आला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.१) रात्री १० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाचे गौण खनिज पथक शासकीय वाहनाने फुलंब्री बाजारतळ परिसरातून जात होते. या पथकात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कडूबा रामभाऊ तुपे, तलाठी सतीश रामराव हराळ, तलाठी भगवान ढोरमारे व चालक कारभारी कचरू कवाळे यांचा समावेश होता.
यावेळी पुलाजवळ काही जण वाळू धूत असल्याचे दिसून आले. तेथे उभ्या असलेल्या तीन वाहनांची चौकशी महसूल पथकाने सुरू केली चौकशीदरम्यान आरोपी राजू शहा, त्याचा मुलगा सोहेल शहा, गुड्डू ऊर्फ साजेद शेख (सर्व रा. फुलंब्री) तसेच इतर पाच जणांनी एकत्र येत महसूल कर्मचाऱ्यांना विरोध केला.
तलाठी सतीश हराळ हे बोलत असताना गुड्डू ऊर्फ साजेद शेख याने अचानक खिशातून चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मध्ये पडलेल्या तलाठी कडूबा तुपे यांच्या डोळ्याजवळ चाकू लागून ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणत महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
या घटनेप्रकरणी तलाठी कडूबा रामभाऊ तुपे यांच्या फिर्यादीवरून राजू शहा, सोहेल शहा, गुड्डू ऊर्फ साजेद शेख व इतर पाच जणांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सहाने करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू वाहतूक वाढली असून याप्रश्नी कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.