

Sambhajinagar's health system is now more capable
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मेडिकल हब म्हणून नावारूपास येत असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील आरोग्य यंत्रणा आता अधिक सक्षम बनली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह राज्य कर्करोग संस्था तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बाहेर राज्यांतील नव्हे तर परदेशातीलही अनेक रुग्ण उपचारासाठी संभाजीनगर शहराला पसंती देत आहेत.
दरवर्षी जगभरात ७ एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पाच वर्षांपूर्वीच्या कोर ोना संकटाने सार्वत्रिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिल्याने शासनाकडून रुग्णांना सार्वजनिक आरोग्य सेवासुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिकचा भर दिला जात आहे.
मराठवाड्यासह इतर भागांतील येणाऱ्या घाटीत अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानाने रुग्णांना खासगी रुग्णालयाच्या तोडीची उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घाटीअंतर्गतच येणाऱ्या राज्य कर्करोग संस्थेत अगदी रोबोटिक सर्जरीने दुर्घर आजाराच्या रुग्णांना बरे केले जात आहे. सुपरस्पेशालिटीच्या सुविधा इतकेच नव्हे तर कोट्यवधीची अद्ययावत यंत्रसामग्री, नवीन उपकरणे, औषधी उपलब्ध झाली आहे. शासन निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून चिठ्ठीमुक्त घाटीचा यशस्वी उपक्रमातून रुग्णांना औषधी मोफत दिली जात आहे.
येथील २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचाही कायापालट झाला आहे. मनपाच्या ४० हून अधिक आरोग्य केंद्रांतून रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच येथील मेडिकव्हर, धूत, सिग्मासह अनेक खासगी रुग्णालयांमधील अद्ययावत उपचार सुविधांमुळे संभाजीनगर शहर हे मेडिकल हब म्हणून नावारूपाला आले आहे.
४०० खाटांच्या महिला व शिशू रुग्णालयाची पडणार भर
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेत सहा मजली भव्य इमारतीत ४०० खाटांचे महिला व शिशू रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या रूपाने लवकरच महिला व शिशूसह गरोदर महिलांना उपचारासाठी अधिकची सुविधा उपलब्ध होणार आहे.