

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरातील तापमान घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून गारवा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा काहीअंशी कमी राहण्याची शक्यता असून १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहाणार असून दिवसा कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्री किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच सकाळच्या सुमारास गारवा आणि दवबिंदूंची मात्रा वाढणार असून काहीप्रमाणात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान शरद ऋतूच्या अखेरीस तापमानातील घसरण सुरू झाल्याने थंडीची चाहूल लागली आहे. रात्री व सकाळच्या वेळेत थंड वाऱ्यांचा जोर वाढत असून शेतकरी वर्गाला याचा फायदा होणार आहे. भाजीपाला, गहू, हरभरा आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी हे हवामान अनुकूल ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यानंतरच्या या स्वच्छ व थंड हवामानाने जिल्ह्यात हिवाळ्याचे आगमन ठळकपणे जाणवू लागले आहे. आगामी काही दिवसांत हवामान कोरडे राहून थंडीचा जोर हळूहळू वाढत जाणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.