

छत्रपती संभाजीनगर : शहरात पाण्याची टंचाई असताना आणि महापालिका प्रशासनाकडून पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे दुरुस्तीच्या कामात लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार टीव्ही सेंटर परिसरात घडला. जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (दि.२) दुपारी जलवाहिनीतील पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आले. पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यावरून वाहत गटारात गेल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
टीव्ही सेंटर जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या १५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत होती. हा व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद होत नसल्याने जलकुंभ भरल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता होती. तसेच रात्रीच्या वेळी काही वसाहतींमधील नळांनाही पाणी येत होते.
ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोमवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, दुरुस्तीपूर्वी जलवाहिनी रिकामी करणे आवश्यक असल्याने त्यातील पाणी रस्त्यावर सोडण्यात आले.
हे पाणी उताराच्या दिशेने शरद हॉटेलसमोरील रस्त्यावरून वेगाने वाहू लागले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, काही ठिकाणी तळमजल्यावरील दुकानांमध्येही पाणी शिरले. अचानक रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह यापूर्वीही दोन ते तीन वेळा दुरुस्त करण्यात आला होता. वारंवार दुरुस्तीची वेळ का येते, याची तपासणी करण्याची गरज आहे. तसेच दुरुस्तीपूर्वी जलवाहिनीतील पाणी अन्यत्र वळविणे किंवा त्याचा वापर करता येईल, अशी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याची नासाडी रोखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच दुरुस्तीच्या वेळी लाखो लिटर पाणी वाया गेल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, दुरुस्तीचे नियोजन कसे करण्यात आले आणि वारंवार बिघाड होणाऱ्या व्हॉल्व्हच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी एमजेपीने दुपारी दोन वाजता पाणीपुरवठा बंद केला. मात्र, जलवाहिनीतील साठलेले लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर सोडण्यात आले. हे पाणी गटारात वाहून गेल्याने पाणी बचतीच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कामगाराच्या चुकीमुळे, व्हॉल्व्हमध्ये गळती- या भागात जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावताना कामगारांकडून चूक झाली होती. त्याठिकाणी थोड्या प्रमाणात लिकेज सुरू होते. त्यामुळे आता पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची सुरुवात असल्याने काही त्रुटी असल्यास त्या काढल्या जात आहे.
महेंद्र गुगलोथ मुख्य व्यवस्थापक, जीव्हीपीआर