

छत्रपती संभाजीनगर : एका नातेवाइकाचा लग्नसोहळा उरकून दुसऱ्या लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने अचानक घाला घातला. समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी बाजूला फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावली, मात्र तिच्या डोळ्यादेखतच पती ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. ही घटना केंब्रिज-सावंगी बायपासवरील गोपाळपूर शिवारात रविवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
अस्लम उस्मान शेख (३५, रा. शहर पळशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी शमा अस्लम शेख (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम शेख हे मिस्तरी काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. रविवारी नातेवाइकाचे लग्न असल्याने अस्लम आणि त्यांच्या पत्नी शमा हे दोघे दुचाकीने झाल्टा येथे गेले होते. तिथला विवाह सोहळा पार पडल्यानंतर, ते तातडीने कोलठाणवाडी येथील दुसऱ्या एका लग्नाला जाण्यासाठी निघाले होते.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोपाळपूर शिवारात आली असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच २५ एजे ६०४१) त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. ट्रकची धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवर मागे बसलेल्या शमा या थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकल्या गेल्या.
मात्र दुचाकी चालवणारे अस्लम हे रस्त्यावरच पडले आणि त्याच अवस्थेत ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडल्या गेले. याचा मार्गावरून त्यांच्या ओळखीचे काही नातेवाईकही लग्नासाठी येत होते. त्यांनी अपघात पाहताचा स्थानिकांच्या मदतीने अस्लम यांना चाकातून बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अस्लम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.
लेकरांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले
ज्या ठिकाण अपघात झाला त्या मार्गावरून अस्लम शेख त्यांच्या ओळखीचे काही नातेवाईकही लग्नासाठी येत होते. त्यांनी अपघात पाहताच स्थानिकांच्या मदतीने अस्लम यांना चाकातून बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्याने या चार कोवळ्या लेकरांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.