

newly married woman blame husband impotent kanpur uttar pradesh
कानपूर : पुढारी वृत्तसेवा
लग्नासाठी तब्बल 38 लाख रुपयांचा खर्च, थाटामाटात वरात आणि स्वप्नांनी भरलेली पाठवणी. मात्र लग्नानंतर सहा महिने उलटूनही पतीने पत्नीपासून अंतर ठेवले, तेव्हा संशय निर्माण झाला. पतीची खरी गोष्ट लपवूनच आपले लग्न लावून देण्यात आले, असा पत्नीचा आरोप आहे. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.
लग्नाची रात्र अनेक मुलींसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण मानली जाते. स्वप्ने, अपेक्षा आणि नव्या नात्याची सुरुवात काही जण तिला ‘गोल्डन नाईट’ असेही म्हणतात. पण कानपूर येथील एका तरुणीसाठी हीच रात्र अशा कटू वास्तवाची सुरुवात ठरली, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
कानपूरच्या किशोर नगर भागात राहणाऱ्या या तरुणीचे लग्न 25 एप्रिल 2025 रोजी हमीरपूर येथील एका युवकासोबत झाले. कुटुंबाने कोणतीही कसर ठेवली नव्हती. हॉटेल, दागिने, विधी, पाहुणचार सुमारे 38 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. थाटामाटात वरात आली, विधी पार पडले आणि 26 एप्रिल रोजी नवरी सासरी दाखल झाली.
मात्र सासरी गेल्यानंतर जे व्हायला हवे होते, ते झालेच नाही. तरुणीचा आरोप आहे की सासरी चार दिवस राहूनही पतीने तिच्यासोबत कोणतेही शारिरिक जवळीक ठेवली नाही. कधी थकव्याचे कारण, कधी टाळाटाळ, तर कधी पूर्ण शांतता. सुरुवातीची लाज किंवा संकोच समजून तिने हे दुर्लक्ष केले. चार दिवसांनी ती माहेरी परतली.
काही दिवसांनी पती तिला नोएडा येथे घेऊन गेला. तिथे मोठ्या काकांच्या फ्लॅटमध्ये दोघे राहिले. पत्नीचा दावा आहे की संपूर्ण महिना एकत्र राहूनही पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तेव्हाच तिच्या मनात संशय बळावला. हळूहळू तिला जाणवले की पती नपुंसक आहे.
याबाबत तिने सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाशी चर्चा केली असता, उलट तिलाच समजावण्याचा प्रयत्न झाला. ‘पत्नी म्हणून साथ दे, उपचार करून घेऊ, त्याचा खर्च आम्ही उचलू,’ असे तिला सांगण्यात आले. मात्र आरोप इथेच थांबत नाहीत. ही बाब कुणाला सांगितली तर बदनामी करू, अशी धमकीही दिल्याचा तिचा दावा आहे.
इतकेच नव्हे, तर उपचारांसाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. पतीची खरी गोष्ट लपवूनच आपले लग्न लावून देण्यात आले, असे तिला वाटू लागले. अखेर ती वडिलांच्या घरी परतली. तिच्या कुटुंबाची बदनामी करण्यात आल्याचाही आरोप आहे.
लग्नावर खर्च केलेली मोठी रक्कम वाया गेली असून तिचे वैवाहिक आयुष्य अधांतरी लटकले आहे. तिने पती, सासरे आणि काका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रावतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश राय यांच्या मते, तरुणीच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीसांची एक टीम हमीरपूर येथेही पाठवण्यात येणार आहे. प्रकरणाच्या प्रत्येक बाजूची चौकशी सुरू आहे. तरुणीच्या कुटुंबाचा आरोप आहे की मुलाची खरी स्थिती लपवूनच लग्न लावण्यात आले. केवळ पैसेच नव्हे, तर मुलीचे आयुष्यही पणाला लागले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ते उघडपणे समोर येण्यास कचरतात.
हे प्रकरण संवेदनशील असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही कथा केवळ अपूर्ण रात्रीची नाही, तर विश्वास, सामाजिक दबाव, प्रतिष्ठा आणि नात्यांच्या गुंतागुंतीची आहे. सत्य काय आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र एवढे नक्की की एका तरुणीचे सुखी स्वप्न आता गंभीर संकटात सापडले आहे.