Crime News : तीस एकरचा मालक तरी महिलांना लुटण्याचा नाद

एकट्या आणि वृद्ध महिलांना हेरून त्यांना कर्ज, लॉटरी आणि नोकरीचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला हसूल पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या.
Crime News
Crime News : तीस एकरचा मालक तरी महिलांना लुटण्याचा नादfile photo
Published on
Updated on

sambhajinagar theft case one arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एकट्या आणि वृद्ध महिलांना हेरून त्यांना कर्ज, लॉटरी आणि नोकरीचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला हसूल पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या. नागोराव सुखदेव श्रीरामे (३०, मूळ रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, सध्या रा. एसटी कॉलनी, सुरेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील पाच तोळे सोने, दुचाकी असा ८ लाख १८ हजारांचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी बुधवारी (दि.१९) दिली. दरम्यान, तो तीस एकरचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News
Maratha Reservation : उपोषणकर्ते दाते पाटील यांची प्रकृती खालावली

आरोपी श्रीरामे याने २५ जुलै रोजी सुमन औटी यांना दुकानासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि तिसगाव शिवारातील एका निर्जनस्थळी नेले.

तेथे जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील ४ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि १ तोळ्याचा नेकलेस असा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. याशिवाय, काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षा सानप या महिलेस 'मुलाला नोकरी लावतो' असे आमिष दाखवून सिडको पुलाजवळून दुचाकीवर बसवले. त्यानंतर आयोध्यानगर-कर्णपुरा भागातील निर्जनस्थळी नेऊन चाकूच्या धाकावर त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा हिसकावून पसार झाला होता. दहा ऑगस्ट रोजी सुमन औटी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, परिमंडळ २ चे उपायुक्त रत्नाकर नवले आणि पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्याचा शोध घेत होते.

Crime News
Sambhajinagar News : चिकलठाण्यात दोन दिवसांत १०२ रजिस्ट्री

पाठलाग करून आवळल्या मुसक्या

आरोपी एसटी कॉलनी (सुरेवाडी) भागात आला असून तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हसूल पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक रफिक शेख, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार फिरोज तडवी, आकाश जायभाये, मोहन सिंगल आणि निर्मला कोलते यांचे पथक तत्काळ तिथे पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपीने दुचाकीने गल्लीबोळातून पळ काढला. तो मोंढ्याकडे गेला, तिथून पुन्हा जळगाव रोडकडे आला. पथकाने सलग दोन किलोमीटर त्याचा पाठलाग करून अखेर त्याला दुचाकी टाकून रिक्षात बसताच ताब्यात घेतले.

खून, पोलिस भरती पेपरफुटीसह गंभीर गुन्ह्यात आरोपी

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नागोराव श्रीरामे हा बारावी पास असून, अविवाहित आहे. तो २०२३ पर्यंत संभाजीनगर शहरात 'प्रहार' नावाने भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमी चालवत होता. मात्र, तिथेही त्याने अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली आणि तो गुन्ह्यात अडकला. त्यानंतर त्याने हिंगोली जिल्ह्यात जाऊन असाच धुमाकूळ घातला. एका महिलेचा खून करून दागिने लुटल्याच्या गुन्ह्यातही तो अटक होता. २०२२-२३ साली कोल्हापूर येथील एका पेपरफुटीच्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्याच्यावर यापूर्वी ७ गुन्हे दाखल आहेत. त्याला एमपीडीए अंतर्गत पोलिसांनी कारागृहात डांबले होते. बाहेर आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तो पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आला. जाधववाडी भागात राहून त्याने पुन्हा महिलांना जाळ्यात ओढून लूटमार सुरू केली होती.

सावत्र आईला दोन मुले

आरोपी नागोरावच्या वडिलांना गावाकडे ६५ एकर जमीन आहे. त्यातील तब्बल ३० एकर जमीन नागोरावच्या नावावर आहे. त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईला दोन मुले आहेत. आईच्या निधनानंतर तो एकाकी पडला आणि गुन्हेगारी मार्गावर गेला, असे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news